गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुलच्या सश्रृत सचिन सासने,रिहान झहीर अब्बास अत्तार यांची महाराष्ट्र फुटबॉल लीगसाठी निवड झाली आहे. पुण्याच्या सिंगमय पुणे एफसी या व्यावसायिक संघाने त्यांची निवड केली आहे. लोणावळा येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) मार्फत राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील लीगमध्ये ते दोघे सहभागी झाले आहेत. स्पर्धेत राज्यातील मुंबई,पुणे,ठाणे,पालघर येथील सोळा संघ सहभागी आहेत. स्पर्धेतील विजेते आणि उपविजेत्या संघाची इंडियन युथ फुटबॉल लीग (आय लीग) स्पर्धेसाठी निवड होणार आहे.


पुण्याच्या सिंगमय एफसी संघाने गेल्या महिन्यात या ठिकाणी निवड चाचणी शिबिर घेतले. त्यानंतर निवडलेल्या या दोघांना अंतिम निवड चाचणीसाठी पुण्याला नेले. तेथील राज्यातून निवडलेल्या २०० खेळाडूंतून अंतिम संघाची घोषणा करण्यात आली. सश्रृत सासने,रिहान अत्तार यांनी यापुर्वी बंगळूर येथील अखिल भारतीय सतरा वर्षांखालील आंतर अकादमी स्पर्धेतही चमकदार कामगिरी करून युनायटेड स्कुलला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. ते दोघे सध्या संभाजीराव माने कनिष्ठ महाविदयलयात अकरावीच्या वर्गात शिकत आहेत. गेल्या तीन वर्षापासून ते युनायटेड स्कुलमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांचे मार्गदर्शन मिळाले. निवडीबद्दल युनायटेड फुटबॉल असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळकी,उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दोघांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



