गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने चिंचली (ता. रायबाग) येथील आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. युनायटेडने अंतिम सामन्यात कर्नाटकच्या भटकल एफसीला टायब्रेकरवर ५-४ असे नमवुन प्रतिष्टेच्या महालक्ष्मी ट्रॉफीसह रोख तीस हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले. युनायटेडचा खेळाडू यासीन नदाफ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटकातील आठ संघ सहभागी होते.


साखळी आणि त्यानंतर बाद पध्दतीने हि स्पर्धा खेळविण्यात आली. साखळीतील पहिल्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेडने गोकाक एफसीला १-० असे हरवून विजयी सलामी दिली. सिध्दार्थ दड्डीकरने हा महत्वाचा गोल केला. दुस-या सामन्यात युनायटेडने बेळगावच्या रेग एफसीवर १-० अशी मात करून उपात्यं फेरीतील स्थान निश्चित केले. युनायटेडचा भरवशाचा खेळाडू सुरज हनिमनाळेने हा निर्णायक गोल मारला. उपात्यं फेरीत गडहिंग्लज युनायटेडने सांगलीचा लीग विजेता मंगळवार फुटबॉल क्लबला एका गोलने नमवून अंतिम फेरी गाठली होती. युनायटेडचा आर्यन दळवीने हा गोल करून संघाला तारले.

अंतिम सामना पुर्णवेळ चुरशीचा झाला. युनायटेडने सामन्यावर वर्चस्व राखले असले तरी अचुकते अभावी गोलकोंडी फुटली नाही. पुर्णवेळ सामना ०-० असा बरोबरीत राहिल्याने पंचानी निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब केला. युनायटेडतर्फे प्रसाद पवार,आर्यन दळवी,श्रवण जाधव,अवधुत चव्हाण,यासीन नदाफ यांनी अचूक गोल मारून संघाला विजयासमीप नेले. युनायटेडचा गोलरक्षक वाहिद मकानदारने भटकल एफसीचा पेनल्टीचा फटका उत्कृष्टपणे अडवून विजयात मोलाचा वाटा उचलला. विजेत्या संघाला प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांचे मार्गदर्शन तर युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, उपाध्यक्ष सतीश पाटील आणि संचालक मंडळाचे प्रोत्यासहन मिळाले.


चौकट…
विजेता संघ असा
यासीन नदाफ,अमर गवळी,श्रवण जाधव,सुरज कोंडूस्कर,प्रविण पोवार,महेश पोवार,प्रसाद पवार, सुरज हनिमनाळे,आर्यन दळवी, सिध्दार्थ दड्डीकर,सत्यम पाटील, सश्रृत सासने,अवधुत चव्हाण, श्रीवर्धन म्हैत्री,सक्षम तोंदले,वाहिद मकानदार,पवन गुठें.

