गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत डॉ घाळी शालेय फुटबॉल लिगला उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सतरा वर्षे गटात केदारी रेडेकर पब्लिक स्कूल, जागृती हायस्कूलने आपपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. साधना हायस्कूलच्या हर्षवर्धन शिंदे, श्रध्देय साठेने गोलची हैटट्रिक करून दिवस गाजविला. येथील एम.आर. हायस्कूलच्या मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेचे यंदाचे सव्वीसावे वर्ष असून दहा संघाचा सहभाग आहे.


विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश घाळी यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. समन्वयक आदर्श दळवी यांनी स्वागत केले. यावेळी गजेंद्र बंदी, प्राचार्य दत्ता पाटील,मुख्याध्यापक एस.एम.तांबे,एम.एस.दड्डी,बी.जी. कुंभार,सचिन मगदूम,सपंत सावंत, सौरभ जाधव यांच्यासह खेळाडू, पालक आणि क्रीडाशिक्षक उपस्थित होते. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. पवन गुंठे यांनी आभार मानले. साधना हायस्कूलने नवोदित एम. आर. हायस्कूलचा ८-१ असा मोठा पराभव केला. साधनाच्या हर्षवर्धन शिंदे,श्रध्देय साठेने मारलेल्या गोलची हैटट्रिक सामन्याचे वैशिष्ट ठरले. एमआरचा स्वरुप शेटकेने गोल करून लढत देण्याचा प्रयत्न केला. साधनाच्या वेदांत पोतदार,अमन कोचरगीने प्रत्येकी एक गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला.

अटीतटीच्या सामन्यात जागृती हायस्कूलने साधना हायस्कूलला १-० असे नमवून महत्वपु्र्ण विजय नोंदविला. जागृतीच्या फरहाण इराणीने नोंदविला गोल निर्णायक ठरला. बरोबरी साधण्यासाठी साधनाच्या सुमित पनोरी,सुरज पोवार,दर्शन तरवाळ यांचे प्रयत्न अपुरे पडले. जागृती हायस्कूलच्या शुभम आडसुळे,आर्यन पाटील यांनी उत्कृष्ठ खेळ केला. रंगतदार सामन्यात केदारी रेडेकर पब्लिक स्कूलने गडहिंग्लज हायस्कूलला १-० असे नमवून विजयी वाटचाल सुरु केली. गडहिंग्लज हायस्कूलने चिवट खेळ करून रेडेकर स्कूलला मध्यतरापर्यंत ०-० असे बरोबरीत रोखले होते. उत्तरार्धात रेडेकर स्कूलच्या शुभम शिंदेने मैदानी निर्णायक गोल करून वाहव्वा मिळवली. गोल फेडण्यासाठी गडहिंग्लज हायस्कूलच्या समर्थ गुंठे, समर्थ भालेकरचे प्रयत्न अपुरे पडले.रेडेकरच्या आदित्य अत्याळकर,ओम चव्हाण यांनी चांगला खेळ केला. सक्षम तोंदले, हर्शल कुरळे,अवधुत चव्हाण,महेश पोवार यांनी पंच म्हणून काम पाहिले.



