गडहिंग्लज प्रतिनिधी : कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी डॉ.शहापुरकर यांनी ‘चेअरमन’ पदाचा राजीनामा देणे खेदाची बाब असून कारखाना कर्जाच्या खाईत घालून राजीनामा देणे दुर्दैवी असल्याचे मत व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण यांनी गडहिंग्लज गोडसाखरचे चेअरमन डॉ.प्रकाश शहापुरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.
पत्रकात म्हंटले आहे की गडहिंग्लज गोडसाखरचे चेअरमन डॉ. शहापुरकर यांनी राजीनामा दिल्याचे आम्हाला कळाले त्यांनी इतक्या तातडीने राजीनामा का दिला, कशासाठी दिला हे तेच जाणीत. परंतु गळीत हंगाम तोंडावर आलेला असताना कारखाना सुरु करण्यासाठीचा प्रयत्न करण्याऐवजी डॉ.शहापुरकर यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला ही खेदाची बाब आहे. एकतर संपूर्ण संचालक मंडळाने त्यांच्याकडे कारखान्याच्या सर्व व्यवहारासंबंधीत निर्णय घेण्याचे अधिकार एकमताने दिले होते. तरीही डॉ. शहापुरकर यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याचा खेद वाटते तथापी त्यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत व येत्या हंगामात कारखाना लवकरात लवकर सुरु करण्या संदर्भातील विचार विनिमय व नियोजन करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक लवकरच घेत आहोत. आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ याच्या नेतृत्वाखाली सभासदांनी कारखान्याची विसकटलेली घड़ी, आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच कारखान्याला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठीच आमच्या आघाडीकडे एकहाती सत्ता सोपविलेली आहे. याचे भान आम्हाला आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीसंदर्भात संचालक मंडळातील विचार विनिमय व निर्णयांअती आम्ही सर्व संचालक नामदार मुश्रीफ साहेबांची भेट घेणार आहोत.
मा.चेअरमन यांनी दिलेल्या अचानक राजीनाम्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर आणि येत्या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचे नियोजन आम्ही करणार आहोत. त्यासंबंधी योग्य ते मागदर्शन आणि पाठबळ मंत्री हसन मुश्रीफ देतील असा विश्वास आहे. गळीत हंगामाची पूर्वतयारी आणि त्यासाठीचे आर्थिक नियोजन करण्यात अपयश आल्यामुळेच डॉ. शहापुरकर यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला असेल असे आम्हाला वाटते. परंतु अचानकपणे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करुन कारखाना वेळेवर सुरळीत चालविण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करु. त्यासाठी कार्यक्षेत्रातील सभागट, शेतकरी,ऊस पुरवठादार, तोडणी-ओडणी वाहतुकदार यांनी मनापासून आमच्या प्रयत्नांना सहकार्य करावे व साथ द्यावे असे आवाहन देखिल आम्ही करीत आहोत.
डॉ.शहापुरकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात आमच्या काही संचालकांवर आरोप केलेले आहेत मात्र त्याचा खुलासा व खंडण आम्ही सद्य परिस्थितीत करु इच्छित नाही. आरोप प्रत्यारोपामुळे वातावरण कलुशित होऊन येणा-या हंगामात कारखाना सुरु करण्यात अडचणी व अडथळे येण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही आरोप प्रत्यारोप टाळत आहोत. वेळोवेळी आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी के.डी.सी.सी. बँकेतून कर्ज पुरवठा करणे तसेच प्रशासकीय स्तरावर मा.साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर यांनी तसेच आम्ही संचालकांनी मा. चेअरमन याना प्रत्येक निर्णयात सहकार्य करण्याची भूमिका घेतली असून सर्वानुमते कारखान्याच्या हिताच्या दृष्टिकोणातून एक मताने ठराव केला होता, ५५ कोटी केडीसीसी बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा विनियोग योग्य पद्धतीने करणे आवश्यक होते मात्र सहकार कायद्याच्या नियमानुसार कोणतीही टेंडर प्रक्रीया न करता प्रत्येक वेळी चेअरमन यांनी सहकार कायद्याची पायमल्ली केली.
कारखान्याचे नुतनीकरण करण्याच्या नावाखाली नविन मशिनरी व पार्ट खरेदी करण्याऐवजी जुन्या मशिनरी (टर्बाईन मोटर,मोटर्स,एअर हॉल्स) साहित्य जुने व बोगस खरेदी केले. या अनुषंगाने मा. साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर, जिल्हा बँक कोल्हापूर यांच्याकडे वेळोवेळी बेकायदेशीर कामाची तक्रार करून कळविण्यात आले. वरील तक्रारीच्या आधारे मा.साखर सह संचालक कोल्हापूर यांनी विशेष लेखा परिक्षकांनी (ऑडीटर) नेमणूक करुन चौकशी सुरु केलेली आहे. लवकरच चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल. त्याच वेळी त्या विषयावर आम्ही बोलू. डॉ. शहापूरकरांचा कारभार जर पारदर्शक असते तर त्यांच्या सोबत असलेले संचालक सुद्धा त्यांच्या कामकाजावर नाराज होऊन त्यांनी देखिल तक्रारी दिलेल्या आहेत. के.डी.सी.सी बँकेकडून कारखान्यास सुरळीतपणे कर्ज पुरवठा चालु असताना देखील मा.चेअरमन हे गुजरातमधील एका ट्रस्टकडून अल्प व्याजदरात ३०० कोटी आणतो असे सांगून गेले सहा महिने सोंग आणत होते. मा.चेअरमन महाशयांनी कारखाना कर्जाच्या खाईत घालून राजीनामा देणे ही दुर्दैवी बाब आहे. माझ्या घरातच कारखान्याचा जन्म झाला असे सांगणाऱ्या डॉ.शहापुरकर यांनी स्वतःच्या कृतीमुळे कारखान्यांवर,सभासदांवर अशी वाईट वेळ आणली. आशावेळी हिंमतीने कारखाना सुरु करण्याऐवजी २५ हजार सभासद,शेतकरी व कामगारांना वाऱ्यावर त्यांनी सोडले आहे.
मा. चेअरमन यांचा मनमानी, नियमबाह्य व बेकायदेशिर कार्याला कंटाळून त्यांचा सह्यांचा अधिकार काढून घेण्यासंदर्भात प्रादेशिक साखर सहसंचालक श्री.मानेकडे तक्रार केली आहे. याअनुषगाने दि. ०६/०९/२०२४ रोजी संचालक मंडळ सभा बोलविणेत आली आहे. सहीचा अधिकार काढून घेण्याकरीता त्या मिटींगमध्ये मा. चेअरमन आपली बाजु न माडता समर्पीत उत्तर न देता त्याच्यापासून निर्माण झालेल्या परिस्थितीपासून मा.चेअरमन पळ काढत आहेत. याचे आम्हाला वाईट वाटत आहे. सदरच्या पत्रकावर व्हाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण,सतीश पाटील,विद्याधर गुरबे,प्रकाश पताडे,काशिनाथ कांबळे,विश्वनाथ स्वामी,रवींद्र पाटील,शिवराज पाटील,अशोक मेंडुले,अक्षय पाटील बाळासाहेब मंचेकर यांच्या सह्या आहेत.