गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबाँल असोसिएशन मार्फत लोकवर्गणीतुन होणाऱ्या दिवाळीतील राष्ट्रीय फुटबाँल स्पर्धेची तयारी गतीने सुरु आहे. गेल्या दोन दिवसापासून फुटबॉलपटूंनी एमआर हायस्कुलच्या मैदानाची दुरुस्ती सुरु केली आहे. सकाळ आणि सांयकाळच्या सत्रात खेळाडू श्रमदानातून मैदानावर पावसामुळे पडलेले खड्डे माती टाकून भरून घेत आहेत. मंगळवारपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेचे हे एकोणीसावे वर्ष असून एकुण अडीच लाख रुपयांची पारितोषिके आहेत.
लोकवर्गणीतून होणा-या या स्पर्धेची दोन महिन्यापासून तयारी सुरु आहे. विविध राज्यातील संघाना आंमत्रित करण्यासह देणगीचे संकलन सुरु आहे. गेल्या आठवड्यात मैदानावरील गवताची कापणी करण्यात आली. दोन दिवसापासून मैदानाची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. यंदाच्या परतीच्या अधिक पाऊसामुळे एम.आर हायस्कुलच्या मैदानावरील माती वाहून गेली आहे. यातून मैदानावर खड्डे पडण्यासह खाचखळगे तयार झाले आहेत. त्यामुळे खेळाडूंना दुखापती होण्याचा धोका आहे. त्यासाठी खाचखळग्यात माती भरून सपाटीकरण सुरु आहे.
सहा दशकापुर्वी अजित क्रीडा मंडळाने दिवाळीत आंतरराज्य स्पर्धांची परंपंरा सुरु केली. अठरा वर्षापुर्वी खंडीत झालेली हि पंरपंरा गडहिंग्लज युनायटेडने चिकाटीने सुरु करून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवली. यंदाची स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघ,वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन,कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशच्या मान्यतेने होत आहे. स्पर्धेतील विजेत्याला रोख ७५ हजार आणि प्रतिष्ठेचा युनायटेड करंडक,उपविजेत्याला पंचावन्न हजार,तुतीय ३५ तर चौथ्या क्रमांकाला २५ हजारांचे पारितोषिक आहे. शिस्तबध्द संघ,उत्कृष्ठ खेळाडूसह प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि लढवय्या खेळाडूसाठी बक्षीसे आहेत. अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी,उपाध्यक्ष सुरेश कोळकी सर्व संचालक आणि समन्वयक सुल्तान शेख, खेळाडू स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.
नवोदित फुटबॉलपटूंची साथ
मैदानाच्या दुरुस्तीत यंदा पंधरा वर्षाखालील युनायटेड फुटबॉल स्कुलच्या नवोदित २० खेळाडूंनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला आहे. हे नवोदित खेळाडू माती आणणे आणि मैदानावर पसरण्यात मोलाची मदत करत आहेत, मैदानावरील खाचगळग्यात माती टाकून त्यावर रोलर फिरवण्यात येणार आहे.