गडहिंग्लज प्रतिनिधी : ते सारे गावभर विविध गल्ल्या,वाड्या-वस्त्यांतील ज्येष्ठ सदस्य. यातील अनेकजण घराबाहेर फारसे न पडणारे. पण दोन दिवस गावच्या मध्यवस्तीतील सभागृहात एकत्र आले. कौटुंबिक प्रश्नांवरील उत्तरे जाणून घेतली. त्यावर अधारित जशी जमेल तशी नाटीकाही सादर केली. दोन दिवसांनी जाताना उतारवयात आनंदी कसे जगावे याचा मंत्र घेवून गेले. निमित्त होते,अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सार्वजनिक गणेशोत्सवात उत्सव नात्यांचा अंतर्गत आयोजित रिलेशानी – संवाद ज्येष्ठांशी या संवाद शाळेचे. पुण्याच्या आरोग्यभान संस्थेच्या सहकार्याने ही संवादशाळा झाली. मोहन देस व श्रुती शालीनी यांनी मार्गदर्शन केले.
संवाद शाळेत सहभागी झालेल्या सर्वात ज्येष्ठ सोनाबाई पाटील व सर्वात कमी वयाच्या राजाराम कसाळे यांच्या हस्ते संवाद शाळेचे उद्घाटन झाले. पहिल्या सत्रात सहभागी ज्येष्ठांचे शारिरीक व मानसिक पातळीवरील प्रश्न जाणून घेण्यात आले. त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात गटचर्चा घेण्यात आली.
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात स्नायूंच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक व्यायाम शिकविण्यात आले. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठांनी सामाजिक,कौटुंबिक प्रश्नांवर नाटीका सादर केल्या. समारोपाच्या सत्रात नात्यातील आनंदाच्या इंद्रधनुष्याची संकल्पना समजावून सांगितली. संवादशाळेतील प्रत्येक सत्र सहभागी ज्येष्ठांच्या प्रत्यक्ष कृतियुक्त सहभागाने झाले. पी.के.पाटील व सिंधुताई पाटील यांची भाषणे झाली. त्यांनी संवाद शाळेतील अनुभव सांगितले. शाहीर शंकर बाटे,शिवराम मोहिते,केरबा पाटील यांनी मानवानो माणुसकीला जागा हे प्रेरणा गीत सादर केले. संवाद शाळेत ४६ ज्येष्ठ नागरीक सहभागी झाले होते.
महिन्यातून एकदा एकत्र येणार..!
दोन दिवसाच्या संवाद शाळेने सहभागी ज्येष्ठ नागरीक भारावून गेले होते. आनंददायी आयुष्यासाठी काहीतरी नवे गवसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. उतारवयात आनंदाची शिदोरी कायम सोबत राहावी यासाठी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी अशाच पद्धतीने ज्येष्ठांना उपयुक्त ठरतील असे वेगवेगळ्या विषयांवरील उपक्रम राबविण्याचा निश्चय करण्यात आला.