Home Uncategorized लढाई जिंकली;गावातील,कुळातील,नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार : मराठा उपसमितीचा मनोज जरांगेंना शब्द.!

लढाई जिंकली;गावातील,कुळातील,नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार : मराठा उपसमितीचा मनोज जरांगेंना शब्द.!

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालं असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं. त्यानुसार गावातील,नात्यातील,कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं.

तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलदगतीने निर्णय घेणार असल्याचंही उपसमितीने मान्य केलं. मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती. त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे, त्यासाठी एक-दोन महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसमितीने केली आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पाच मागण्या केल्या होत्या. त्यावर मराठा उपसमितीकडून आठ प्रस्ताव जरांगे यांना देण्यात आले. हैदराबादच्या गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच उपसमितीने मसुद्यात ज्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत त्यावर तातडीने जीआर काढण्यात येणार असल्याचा शब्द उपसमितीने दिला आहे.

उपसमितीने मागण्या मान्य केल्यानंतर त्याचा तातडीने जीआर काढावा,जीआर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांनी एकच जल्लोष केला.

गावातील,नात्यातील,कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार..!

मराठा उपसमितीने मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि मसुद्यामध्ये काय तरतूद केली आहे याची माहिती दिली. मराठा उपसमितीमध्ये अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता. याआधी शिंदे समितीने जरांगे यांच्याशी चर्चा केली होती. नंतर यासंदर्भात मराठा उपसमितीशी चर्चा केली. त्यानंतर मराठा उपसमितीने मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार केला आणि तो जरांगे यांना दिला.

Related Posts

Leave a Comment