गडहिंग्लज प्रतिनिधी : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सार्वजनिक गणेशोत्सवात नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सव नात्यांचा या थीमवर अधारित यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. कौटुंबीक नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शालेय विद्यार्थी, महिला,ज्येष्ठ नागरीकांसाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळांचे आयोजन केले आहे.
अत्याळ येथे एक गाव एक गणपती या उपक्रमांतर्गत गेल्या अडीच दशकापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी समाजातील एक प्रश्न घेऊन काम केले जाते. यंदा कौटुंबीक नात्यांवर अधारित उत्सव साजरा केला जाणार आहे. गुरुवारी (ता.२८) सायंकाळी साडेसातला पाद्य पुजा पालकांची हा कार्यक्रम आहे. योग गुरु दत्ता पाटील (म्हाळुंगे,ता. करवीर) मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी (ता.२९) सकाळी अकराला विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या नजरेतला मी या विषयावर तर सायंकाळी साडेसातला पालकांसाठी पाल्याच्या नजरेतून माझी भूमिका या विषयावर मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. विश्वनाथ पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. शनिवारी (ता.३०) सकाळी आठला विद्यार्थ्यांसाठी वाचनकट्टा संस्थेचे (कोल्हापूर) संकल्पक युवराज कदम यांची मूल्यसंस्कार कार्यशाळा होईल.
२ सप्टेंबरला चार पिढ्या आणि ३० सदस्य एकत्र नांदणाऱ्या गडहिंग्लज शहरातील तेलवेकर कुटुंबाशी गप्पा मारण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सायंकाळी साडेसातला हा कार्यक्रम होईल. ३ व ४ सप्टेंबरला पन्नास वर्षांवरील नागरीकांसाठी रिलेशानी-संवाद ज्येष्ठांशी ही संवादशाळा होईल. आरोग्य भान संस्थेचे (पुणे) कार्यकर्ते नागरीकांशी संवाद साधणार आहेत. ५ सप्टेंबरला रात्री नऊला होममिनिस्टर अर्थात सासू-सूनेची जोडी नात्याची वाढवी गोडी हा वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम होणार आहे. प्रा.शिवाजी पाटील हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना आरतीचा मान..!
दरवर्षी गावातील एका घटकाला आरतीचा मान दिला जातो. यंदा शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आरतीचा मान देण्यात आला आहे. दररोज एका इयत्तेतील विद्यार्थी व पालकांच्या हस्ते आरती होईल. अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांनाही संधी दिली आहे. विसर्जन मिरवणुकीला गावातील विठ्ठल रुक्मिणी वारकरी सांप्रदायाची वारकरी दिंडी आहे.