गडहिंग्लज प्रतिनिधी : विद्यमान लोकप्रतिनिधींनी केवळ स्वतःचा आणि कांही ठेकेदार यांचाच विकास केला. लोकनेते स्व.बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर या विभागाच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत राजे समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेत पाठवूया असा निर्धार महाविकास आघाडीच्या गडहिंग्लज,उत्तुर,गिजवणे-कडगाव जि.प.मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कडगाव(ता-गडहिंग्लज)येथील शेवाळे मंगल कार्यालयात महाविकास आघाडी प्रणीत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार),राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना(उध्दव ठाकरे)गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा झाला.
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ.नंदाताई बाभुळकर म्हणाल्या की हा मतदारसंघ स्व.बाबासाहेब कुपेकर यांनी तळ हातावरील फोडाप्रमाणे जपला. आज त्यांच्या पश्चात शरद पवार यांच्या विचारांची लढाई जिंकण्याची वेळ सर्वांवर आलेली आहे. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत राजे समरजितसिंह घाटगे यांना निवडून आणण्यासाठी एक पाऊल आम्ही पुढे टाकू.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे नेते राजे समरजिसिंह घाटगे म्हणाले की कागल,गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे. कुटुंबाकडे मतदान नाही तर आशिर्वाद मागण्यासाठी आलो आहे. आपण सर्वांनीच आपल्या कुटूंबातील या सदस्याला येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आशिर्वाद देऊन कागल,गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणावे आणि आपला लोकसेवक म्हणून काम करण्याची संधी द्यावी.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी म्हणाले स्व.बाबासाहेब कुपेकरांच्या पश्चात गडहिंग्लज सारख्या सुसंस्कृत शहराचा लौकिक वाढविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांना निवडून आणुया. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर चव्हाण म्हणाले की स्व. कुपेकरांच्या पश्चात गडहिंग्लजसह परिसराचे वाटोळे कोणी केले..? गडहिंग्लज साखर कारखाना अडचणीत आणण्याचे आणि बंद पाडण्याचे पाप केले..? हे येथील जनतेला ठाऊक आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करून याचा वचपा काढल्याशिवाय जनता राहणार नाही. असा खोचक टोला मुश्रीफ यांचे नाव न घेता लावला. तर राष्ट्रीय काँग्रेसचे अभिषेक शिंपी म्हणाले पालकमंत्र्यांनी राजकीय सोयीसाठी बदललेल्या भूमिकेची किंमत येत्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना चुकवावी लागेल.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप माने,ॲड.दिग्विजय कुराडे,आझाद पटेल,संजय पाटील,संपतराव देसाई,अमृत पाटील,संदीप कुराडे,तानाजी चौगुले,महादेव मोरे, रवी पाटील,संतोष पाटील,बसवराज आजरे,युवराज पवार,विठ्ठल उत्तुरकर,राजू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रविंद्र घोरपडे,शहाजी पाटील,पी.वाय.पाटील,जनार्दन निऊंगरे,अजित पाटील, दत्तात्रय शिवगण,तानाजी चौगुले,विकास पाटील,सुभाष चराटी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समरजितराजेंचा विजय निश्चित
यावेळी रामराजे कुपेकर म्हणाले की कागल विधानसभा मतदारसंघातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजे समरजितसिंह घाटगे कष्ट घेत आहेत.ते उच्च विद्याविभूषित असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. स्व.कुपेकरांचा हा मतदारसंघ आहे.त्यांच्या आशीर्वादानेच राजेंचा विजय या मतदारसंघातील सामान्य जनताच खेचून आणेल.