गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज ग्रामीण केंद्रात कोणताही कार्पोरेट पुरस्कर्ता नाही. पण,लोकवर्गणीतून खेळाडूंना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी युनायटेडचा प्रयत्न कायम आहे. व्यावसायिक संघाच्या धर्तीवर डेव्हलपमेंट संकल्पनेच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रशिक्षण, तुल्यबळ संघाशी सामने खेळण्याची अधिक संधी, किट अशा उपक्रमातून पंधरा आणि अठरा वर्षाखालील खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. या सुविधांतून फुटबॉलपटूंनो प्रगती करा’’ असा सल्ला गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी यांनी दिला.
येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे पंधरा आणि अठरा वर्षाखालील डेव्हलपमेंन्ट संघातील खेळाडूंना किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. जेष्ट खेळाडू महादेव पाटील अध्यक्षस्थानी होते. अभिजित चव्हाण यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात अठरा वर्षाखालील डेव्हलपमेंट संघाच्या कामगिरीचा आढावा घेतला. डॉ हत्तरकी पुढे म्हणाले, ‘’पुर्वीच्या तुलनेत खेळाडूंना अधिक सुविधा दिल्या जात आहेत. केवळ मोठ्या शहरातील व्यावसायिक संघातील खेळाडूंना अशा सुविधा मिळतात. मात्र, युनायटेडने स्थानिक टँलेन्टला बळ मिळावे म्हणून ही डेव्हलपमेंन्ट संकल्पना सुरु केली आहे.’’
प्रा.सुनिल शिंत्रे म्हणाले, ‘’अजित क्रीडा मंडळाने रुजवलेल्या फुटबॉलचे वटवृक्षात रुपातंर करण्याचे काम युनायटेडने केले आहे. खासकरून मोबाईल, टिव्ही यांच्या मोहजालातून सोडवत विद्यार्थी आणि युवक फुटबॉलच्या माध्यमातून मैदानात येतात हि समाधानाची बाब आहे.’’
यावेळी पंधरा आणि अठरा वर्षाखालील ४० खेळाडूंना किट,बुट देण्यात आले. उद्योजक सुभाष बेळगुद्री,युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे,प्रशांत दड्डीकर,बाळासाहेब दळवी,विजय पाटील,तानाजी देवेकर, महेश सुतार,यासीन नदाफ यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. संचालक मनिष कोले यांनी आभार मानले.
वृक्षारोपण…
युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम.आर.हायस्कुल मैदानाभोवती दहा कडूलिंबाची झाडे एमआरचे प्राचार्य संजय कुंभार,डॉ.हत्तरकी यांच्या हस्ते लावण्यात आली. ही झाडे सर्वंधन करण्याची जवाबादारी फुटबॉलपटूंचे गट करून सोपविण्यात आली. सरावापुर्वी पाण्याची एक बादली या संकल्पनेतून मैदानाभोवती यापुर्वी युनायटेडच्या खेळाडूंनी ३० वड, पिंपळ,जाभुंळ,गुलमोहराची झाडे खेळाडूंनी जगवली आहेत.