आजरा प्रतिनिधी : आजरा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार पदावर कार्यरत असणाऱ्या निवास वसंत पाटील(वय-४३) यास आज(ता-२०) सहा हजारची लाच घेताना लाचलुचपत विभागाने कारवाई केली. सदरच्या कारवाईमुळे आजरा तालुक्यात खळबळ उडाली असून निवास पाटील याच्याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या खूप तक्रारी होत्या. तसेच कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी देखील भूमी अभिलेख कार्यालयाच्या दारात भ्रष्ट कारभारा विरोधात आंदोलन केले होते.
अधिक माहिती अशी की निवास वसंत पाटील (वय- ४३) हे निमतानदार म्हणून उप अधीक्षक,भूमी अभिलेख कार्यालय आजरा,येथे कार्यरत होते. २९ वर्षीय तक्रारदार यांच्या आईचा मामा यांना वारस नसल्याने त्यांनी त्यांची मिळकत मृत्युपत्राद्वारे तक्रारदार यांची आई हयात असताना त्यांचे नावे केली होती. तक्रारदार यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांना मृत्युपत्राद्वारे मिळालेल्या मिळकतीमधील गाव चिमणे(ता-आजरा) येथील न भू क्र 373 या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्डाला वारसा हक्काने तक्रारदार यांचे तसेच त्यांचे वडील व भाऊ यांचे नाव लावणे करिता उपअधीक्षक,भूमी अभिलेख कार्यालय,आजरा येथील निमतानदार यांनी तक्रारदार यांचेकडे ६०००/- रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार आलेनंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. तर ६०००/- रुपये लाच आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी विरुद्ध आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई सरदार नाळे,बापु साळुंखे, प्रकाश भंडारे,सुनील घोसाळकर,सचिन पाटील, संदीप काशीद यांच्या लाचलुचपत टीमने केली.