गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज, आजरा तालुक्यात सुरु असलेल्या नेत्रदान चळवळीत एकाच दिवशी दोन महिलांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. सरोळी (ता.आजरा) येथील सुशीला दत्ताजी पाटील (वय ९०) व ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील ताराबाई कलाप्पा कागवाडे (वय ६७) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. चळवळीत एकाच दिवशी दोन नेत्रदान होण्याची चळवळीत दुसऱ्यांदा घटना घडली आहे.
सुशीला पाटील यांचे गुरुवारी (ता.४) सकाळी अकराच्या सुमारास निधन झाले. तर ताराबाई कागवाडे यांचे दुपारी अडीचच्या सुमारास निधन झाले. दोघींच्याही नातेवाईकांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने सरोळी व ऐनापूरात जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे सरोळी गावात गेल्या तीन वर्षांत नेत्रदान झाले नव्हते. सुशीला पाटील यांच्या नेत्रदानामुळे सरोळीत चळवळीला गती मिळाली आहे.
सरोळीतील चौथे तर ऐनापूरातील १४ वे नेत्रदान आहे. चळवळीत यापूर्वी पांडूरंग जाधव (करंबळी) व वसंत ढवळ (आजरा) यांचे एकाच दिवशी नेत्रदान झाले आहे.