गडहिंग्लज प्रतिनिधी : कुटूंबात प्रत्येकजण आपपली जबाबदारी चोखपणे पार पाडतो. मोठ्यांना आदर आणि छोटयांना सहकार्याचा हात देत अत्यंत आनंदाने राहतो. माझं पेक्षा आपले मानून मोठ्या मनाने प्रत्येकाशी आपलुकीने वागणे हेच आमच्या एकत्रित कुटूंबाचे रहस्य असल्याचे प्रतिपादन तेलवेकर कुटुंबीयांनी व्यक्त केले.
अत्याळ(ता.गडहिंग्लज) येथील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्सव नात्यांचा या कार्यक्रमात चार पिढ्या आणि ३० सदस्य असणा-या येथील तेलवेकर कुटूंबियानीं आपल्या एकीचे रहस्य उलगडून सांगितले. अवधुत पाटील यांनी प्रास्ताविक केले. निवेदिका राजश्री कोले यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून तेलवेकर कुटूंबियाच्या १४ सदस्यांना बोलते केले.
तेलवेकर कुटूंबाच्या जेष्ट सदस्या श्रीमती इंदिरा तेलवेकर यांचा प्रशासक देशपांडे यांनी गौरव केला. अरूण तेलवेकर म्हणाले, वडिलांना वडिलोपार्जित केवळ पावणे दोन एकर शेत आणि जुने घर मिळाले होते. पण आज पंधरा एकरहून अधिक शेत जमीन आणि विविध ठिकाणी मोठी स्थावर मालमत्ता केवळ एकत्रित कुटूंबातील सर्वांच्या मेहनतीने साकारता आली.
विद्या तेलवेकर म्हणाल्या, घरकामात सर्वच महिला एकमेंकीना मदत करत असल्याने एकोपा अधिक आहे. खासकरून समजूतदारपणामुळे कामाचा ताण वाटत नाही. प्रियंका तेलवेकर म्हणाल्या, ‘’सुना,सासू असा नातेसंबध न ठेवता मैत्रिणीच्या भावनेने काम करत असल्याने स्नेहाचा बंध अधिक घट्ट झाला आहे. पुरूष मंडळी शेती,व्यवसायात तर महिला घरकामात दंग असल्याने इतर कारणांसाठी कुणालाच वेळ नाही’’ प्रकाश तेलवेकर म्हणाले, कुटूंबातील नव्या पिढीचे सदस्य उच्चशिक्षित असुनही परंपरागत व्यवसायात कमीपणा न मानता कार्यरत राहिल्याने एकीचा धागा टिकून आहे.”कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती.
कुटुंबाची ओढ..!
तेलवेकर कुटूंबातील शशिकांत तेलवेकर(फार्मसी) हे गोव्याला नोकरीला लागले. विवेक तेलेवकर (एमबीए),रणधीर तेलवेकर (इंजिनियर) यांनी पुण्यात नोकरी स्विकारली. पण एकत्र कुटूंबाच्या ओढीमुळे त्यांनी अल्पावधीत नोकरीचा त्याग करून पारंपरिक व्यवसायात लक्ष घालत पैश्यापेक्षा कुटुंबाचे महत्व अधोरेखित केले.