गडहिंग्लज प्रतिनिधी : सतरा वर्षाखालील रंगतदार अंतिम फुटबॉल सामन्यात शिवराज इंग्लीश मिडियम स्कुलने न्यू होरायझन स्कुलला टायब्रेकरमध्ये ४-३ असे नमवुन विजेतेपद पटकाविले. पेनल्टीचे दोन फटके अडविणारा शिवराजचा आलोक पाटील सामन्याचा हिरो ठरला. होरायझन स्कुलचा समर्थ कापसेने स्पर्धावीराचा बहुमान मिळविला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम.आर.हायस्कुलच्या मैदानावर डॉ. घाळी शालेय लिग सुरु आहे. स्पर्धेचे यंदाचे सव्विसावे वर्ष आहे.


चुरशीच्या अंतिम सामन्यात आक्रमक खेळ करूनही दिशाहिन फटक्यामुळे मध्यतरापर्यंत गोलकोंडी फुटली नाही. उत्तरार्धात २८ व्या मिनिटाला शिवराजच्या मयुरेश अष्टेकरने गोल मारला. पाठोपाठ होरायझनच्या समर्थ कापसेने उत्कृष्ठ गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. निर्धारित वेळेत सामना १-१ असाच बरोबरीत राहिल्याने पंचानी निकालासाठी टायब्रेकरवरचा अवलंब केला. यात शिवराजच्या रिहान बोजगर,अखिलेश कुराडे,आलोक पाटील,समीन मणेर यांनी तर होरायझनच्या वीर पाटील,समर्थ कापसे,प्रणव जगतापलाच गोल करता आले. अखेर ४-३ गोलफरकावर शिवराजने विजेतेपद पटकावून बाजी मारली. साखळीतील पहिल्या सामन्यात पराजयाला सामोरे जाणाऱ्या शिवराजने अनपेक्षितपणे स्पर्धेत अंतिम सामन्यात जिगरबाज खेळ करून विजेतेपदाला गवसणी घातली.

विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद कित्तुरकर,माजी नगराध्यक्ष राजन पेडणेकर,गजेंद्र बंदी, युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे यांच्या हस्ते विजेते,उपविजेंत्याना बक्षिसे देण्यात आली. यावेळी तुषार पाटील, मुख्याध्यापक ए.बी.पाटील,संजय घाळी,सुशांत घाळी यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. समन्वयक आदर्श दळवी यांनी स्वागत केले. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. ललित शिंदे यानी आभार मानले. दरम्यान, लीगमध्ये बेळगावचे सेंट झेवियर्स आणि चिकालगुडचे शंकरलिंग मॉडेल स्कुल,जागृती हायस्कुल,साधना हायस्कुलला हरवून शिवराज व होरायझनने अंतिम फेरी गाठली होती. यासीन नदाफ,ओमकार घुगरी, सागर पोवार,सुरज कोंडूस्कर,प्रविण पोवार,समर्थ सावरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.


सर्वोत्कृष्ट खेळाडू
स्पर्धावीर – समर्थ कापसे (होरायझन)
गोलरक्षक – ओझर रोटीवाले (बेळगाव)
बचावपटू – वेदांत राऊत (शिवराज)
मध्य़रक्षक- रिहान बोजगर (शिवराज)
आघाडीपटू- मयुरेश अष्टेकर (होरायझन)

