गडहिंग्लज प्रतिनिधी : युनायटेड राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी गोव्याचे सेसा अँकाडमी, एफसी गोवाने प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपात्यं फेरी गाठली. यजमान गडहिंग्लज युनायटेडने केरळ सेंट्रल एक्साईज संघाचा धक्कादायक पराभव करून घौडदौड केली.कोल्हापूरचा खंडोबा तालीम मंडळ गैरहजर राहिल्याने मुंबईला पुढे चाल मिळाली. उद्या (ता. २०)दुपारच्या सत्रात उपात्यं फेरीचे दोन सामने होणार आहेत. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर हि स्पर्धा सुरु आहे. स्पर्धा पाहण्यासाठी शौकीनांची गर्दी होती.
चुरशीच्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेडने अनपेक्षितरित्या केरळला एका गोलने नमविण्याची किमया केली. पुवार्धात चौदाव्या मिनिटाला अनुभवी ओमकार जाधवने ‘बर्थडे बॉय’ अमित सावंतच्या फ्रि किकवर सुरेख हेडव्दारे निर्णायक गोल केला. उत्तरार्धात केरळच्या बेबीसिंग, थॉमसने आक्रमक खेळ करून युनायटेडला दबावाखाली ठेवले. पण, युनायटेडचा गोलरक्षक अमर गवळी, सुरज कोंडूस्कर,सुल्तान शेख यांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.सेसा अँकाडमीला नवख्या सिल्वासाने विजयासाठी झुंजविले. उत्तरार्धात डँनियल गोम्सच्या भेदक हेडने केलेल्या गोलमुळे गोव्याने सुटकेचा श्वास सोडला.सिल्वासाच्या विशाल दुबे, प्रसनसिंग यांचे चिवट प्रयत्न अपुरे ठरले.शेवटच्या सामन्यात एफसी गोवाने बेळगाव युनायटेडचा दोन गोलनी पाडाव केला. उत्तरार्धात गोव्याच्या मोहम्मद शेख,आल्फिनो यांनी गोल मारले.
शौकीनांची निराशा खंडोबा संघ ऐनवेळी गैरहजर राहिल्याने उपस्थित शौकीनांची निराशा झाली. कालच्या (ता. १८) सामन्यासाठीही हा संघ तब्बल दीड तास उशिरा पोहचला.अक्षरशः एकेक खेळाडूला आणून संयोजकांनी मैदानात सोडले.उपात्यंपुर्व फेरीचा सामना असुनही हा संघ बेजवाबदारपणे गैरहजर राहिला. लोकवर्गणीतून दरवर्षी देशातील बलाढ्य संघाशी स्थानिकानां खेळण्य़ास मिळावे असा संयोजकाच्या उदात्त हेतूला खंडोबाच्या गैरहजेरीने गालबोट लागल्याची चर्चा मैदानावर होती.
उद्याचे सामने
१. एमवायजे- जीएमएससी, मुंबई वि. एफसी गोवा दु. १.३० वा.
२. गडहिंग्लज युनायटेड वि. सेसा अँकाडमी, गोवा. दु. ३.३० वा.