Home Uncategorized कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे ‘समाजभूषण’ पुरस्कार ‘डॉ.बाबा आढाव’ यांना जाहीर

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे ‘समाजभूषण’ पुरस्कार ‘डॉ.बाबा आढाव’ यांना जाहीर

by strnk

गडहिंग्लज प्रतिनिधी : शिवराज विद्या संकुला मार्फत देण्यात येणारा पहिला कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार ‘डॉ.बाबा आढाव’ यांना जाहीर करण्यात आला असून सदरचा पुरस्कार वितरण सोहळा ३१ जानेवारी सायंकाळी पाच वाजता संस्थेचे अध्यक्ष किसनराव कुराडे,प्राचार्य डॉ.एस.एम.कदम,के.जी.पाटील, जे.वाय.बार्देस्कर,दिग्विजय कुराडे,विश्वजीत कुराडे या प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज विद्या संकुल येथे संपन्न होणार आहे.

गडहिंग्लज,आजरा,चंदगड आणि सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने साठ वर्षांपूर्वी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था अंतर्गत शिवराज विद्या संकुलाची स्थापना झाली. कला व वाणिज्य शाखेने सुरुवात झालेल्या संस्थेत आज केजी पासून पीएचडी पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. या ६० वर्षांमध्ये संस्थेने शिक्षण क्षेत्राबरोबरच गडहिंग्लज उपविभागात सामाजिक, आर्थिक,सहकार,सांस्कृतिक आदी क्षेत्रातील आपले मोलाचे योगदान दिले आहे. अनेक सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू शिवराज विद्या संकुलच राहिले आहे.

थोर समाजसेवक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी हयातभर कार्य केले. प्रार्थना समाज,ब्राह्मो समाज,डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून रात्र शाळा,उद्योग शाळा, अस्पृश्यांची शेती परिषद,अंधश्रद्धा निर्मुलन,जटा निर्मुलन,मुरळी प्रतिबंध,मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह अशा अनेक चळवळी उभ्या केल्या आणि कार्य केले. तरीही ते उपेक्षित राहिले. त्यांचे एक जिवंत स्मारक व्हावे याकरिता विद्यमान अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व तत्कालीन संस्था पदाधिकाऱ्यानी संस्थेचे नाव कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था असे दिले. गेली ६० वर्षे ही संस्था शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहे.

संस्थेच्या ६० वर्षे पूर्ती निमित्ताने सन २०२५ पासून कर्मवीरांनी ज्याप्रमाणे परीघाबाहेरील समाजघटकांसाठी कार्य केले त्याचप्रमाणे त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा चालविणाऱ्या आणि सामाजातील वंचित,गोरगरीब,कष्टकरी,शोषित घटकांसाठी काम करणाऱ्या अतुलनीय व्यक्तीमत्वास राज्यस्तरीय कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

यानुसार पाहिल्या राज्यस्तरीय कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कारासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांचे नाव सुचविण्यात आले आणि ते सर्वानुमते मान्य करण्यात आले. बाबा १९४२ साली राष्ट्र सेवा दलाचे सक्रीय सदस्य बनले तेव्हा पासून त्यांनी अनेक चळवळी,संघटना उभा करून त्यांच्या माध्यमातून परीघाबाहेरील समाजघटकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी कार्य केले. म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांच्यामुळे या पुरस्काराची उंची तर वाढणार आहेच त्याचबरोबर अनेक सामाजिक चळवळीना गती येणार आहे व नव कार्यकर्त्यांना उर्जा मिळणार आहे.

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार स्वरूप
शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट,सन्मान चिन्ह व रोख रक्कम रुपये २५०००/- असे असून पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे

Related Posts

Leave a Comment